
परभणी, 25 मार्च (हिं.स.)। भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त “टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम”देशभरात राबविण्यात येणार असून, महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने ही मोहीम राज्यातील सर्व जिल्हे व शहरी भागांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत एआय आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगद्वारे निवडण्यात आलेल्या ११,०९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नि-क्षय पोर्टलवरील एआय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व रूट मॅपिंग करण्यात आले असून, वृद्ध, मधुमेही, कुपोषित, पीएलएचआयव्ही, क्षयरुग्णांचे संपर्क, स्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १००% तपासणी सुनिश्चित केली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हाताने वापरता येणारे क्ष-किरण यंत्रणांद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ एनएएटी चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये नि-क्षय मोबाईल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येतील.
या मोहिमेत आयुष्मान आरोग्य शिबिरांद्वारे क्षयरोगासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, अॅनिमिया व कुपोषण यांसारख्या आजारांची एकत्रित तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विविध विभागांचा समन्वय साधत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, स्वयं सहाय्यता गट, माय भारत स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार असून, नि-क्षय मित्र उपक्रमाद्वारे रुग्णांना पोषण व मानसिक आधार दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis