
परभणी, 25 मार्च (हिं.स.)।
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, दे आसरा फाउंडेशन व कमलताई जामकर महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाताई जामकर महिला महाविद्यालय येथे उद्योजक मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन सेल्स व ग्रोथ एक्सपर्ट राहुल लिमये व उद्योजक विशाल सरदेशपांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठी विभागप्रमुख अरुण पडघन होते. यावेळी दे आसरा फाउंडेशनच्या स्नेहा ननावरे, मनीष भुतडा तसेच कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
स्नेहा ननावरे यांनी विशाल सरदेशपांडे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत त्यांनी उद्योग उभारणीतील स्वतःचे अनुभव, भांडवल गुंतवणूक, आर्थिक नियोजन तसेच अडचणींवर मात करण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले. परभणीसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमातील प्रश्नोत्तर सत्रात उपस्थित उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले.
राहुल लिमये यांनी “उद्योग का करावा?” या विषयावर मार्गदर्शन करत सूक्ष्म व लघु उद्योजकांना भेडसावणाऱ्या प्रारंभीच्या अडचणी, मार्केटिंग प्रणालीची उभारणी आणि भांडवल उभारणीच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis