
अकोला, 24 मार्च : अकोला शहरात अवैध सावकारीविरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून, अनेक महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सहकार व पोलीस विभागाच्या पथकांनी एकत्रितपणे 9 अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून एकूण 16 ठिकाणी धाड टाकली.
या मोहिमेत सुमारे 90 सहकार विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि 45 पोलीस अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. फिरत्या पथकात उपनिबंधक ज्योती मलिये, सहाय्यक निबंधक अभयकुमार दे कटके, कार्यालय अधीक्षक अनिल मनवर आणि कनिष्ठ लिपिक आशिष घाटोळे यांचा समावेश होता.
महत्त्वाचे दस्तऐवज जप्त
छापेमारीदरम्यान इसार पावत्या, कोरे चेक, कोरे बॉण्ड, खरेदीखतांची कागदपत्रे, डायऱ्या, करारनामे, गहाणखत, सातबारा उतारे तसेच रोकड वही आणि खातावही यांसारखे आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
प्राप्त कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू असून, तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सावकारांच्या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे