
अकोला, 24 मार्च (हिं.स.)।जठार पेठ येथील बिर्ला राम मंदिर मंगळवारी सायंकाळी भक्ती, कला आणि संस्कृतीच्या तेजाने उजळून निघाले. “रामायण” या भव्य नृत्यनाटिकेच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या नृत्यनाटिकेची संकल्पना व दिग्दर्शन सई सुयोग रानडे यांनी अत्यंत कल्पकतेने साकारत रामायणातील प्रसंगांना जिवंत केले. कार्यक्रमाचे ओघवते आणि प्रभावी सूत्रसंचालनया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे सौ. शितल थोडगे आणि तृप्ती रानडे यांनी. ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक सुसूत्रता आणि आकर्षक लय प्राप्त झाली.
मंगलमय गणपती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात होताच वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर रामाष्टक, “जमाई राजा”, “अवनी धाम”, “जय जय जननी”, ऊर्जादायी शिव तांडव, भावस्पर्शी “राम आयेंगे तो”, कृष्णावर आधारित आष्टपदी, “घर मोरे परदेसीया”, हनुमान चालीसा आणि पारंपरिक गोंधळ अशा विविध नृत्यरचनांमधून रामायणाची कथा रंगतदार पद्धतीने उलगडली गेली. प्रत्येक सादरीकरणात नेटक्या हालचाली, आकर्षक वेशभूषा आणि भावपूर्ण अभिनय यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला.
विशेष आकर्षण ठरलेल्या गोंधळ सादरीकरणात पद्मजा पांडे आणि स्वरा बोरकर यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यांच्या सादरीकरणाने पारंपरिकतेची झलक रंगमंचावर खुलून आली.या नृत्यनाटिकेत अश्विनी जोशी, रेवती पुसेगावकर, दीप्ती तेल्हारकर, पद्मजा पांडे, शिल्पा भटुरकर, ज्योती भटुरकर, माधुरी अभ्यकर, प्रीती पाटकर,. शुभांगी तिडके, स्वरा बोरकर आणि सारिका देशपांडे या कलाकारांनी आपल्या नृत्य आणि अभिनयातून कार्यक्रमाची उंची अधिकच वाढवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे