
पुणे, 24 मार्च, (हिं.स.) - वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध कारवाई करण्यासाठी तयार केलेल्या ‘पीटीपी ॲप’वर नागरिकांनी बेकायदा फलकांची माहिती कळवावी’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे. बेकायदा फलक लावणाऱ्यां विरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यंनी दिला. शहरातील बेकायदा फलकांवर कारवाई करण्यासाठी ‘होर्डिंगमुक्त पुणे’ ही विशेष मोहीम महापालिका प्रशासन आणि पुणे पोलिसांनी घेतली आहे. बेकायदा फलकांमुळे शहर विद्रुुप होत असून, पुण्यातील बेकायदा फलकांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत शहरातील बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता.
‘होडिंगमुक्त पुणे’ या मोहिमेतंर्गत शहरातील बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.‘वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पीटीपी ॲप तयार केले आहे. या ॲपवर नागरिकांना वाहतूक नियमभंगाची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी या ॲपला उस्फूर्ते प्रतिसाद दिला. पीटीपी ॲपच्या माध्यमातून बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी बेकायदा फलकांची माहिती कळवावी’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु