
चंद्रपूर, 24 मार्च (हिं.स.) : चंद्रपूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल संपल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा आणि नियमित साठा उपलब्ध आहे. सध्या कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई निर्माण झालेली नसून इंधनपुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत आहे. संबंधित यंत्रणांकडून पुरवठ्यावर सातत्याने देखरेख ठेवली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना खालील बाबींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:
अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा किंवा जास्त प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न करू नये.
पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्या आवश्यक उपाययोजना करत आहेत, यावर विश्वास ठेवावा.
अफवा पसरवणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे; अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल.
कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.
प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना शांतता व संयम राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव