
परभणी, 25 मार्च (हिं.स.)।
वांगी रस्त्यावरील अपना नगर भागातील मारोती मंदिरातील मारोतीची मुर्ती महानगरपालिकेच्या एका पथकाने फौजफाट्यानिशी हटविल्यास ओट्यासह टीनशेड जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजबांधवांनी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून महानगरपालिकेच्या अधिकार्यांना हनुमानाची मुर्ती हटविल्यासह ओटा व शेड जमीनदोस्त केल्याबद्दल जाब विचारला. गेल्या नऊ वर्षांपूर्वी मारोतीची या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. परिसरातील हिंदु बांधव रोज या मंदिरात पुजापाठ करीत आले आहेत. या मंदिराचा कोणालाही त्रास नाही. असे असतांना महापालिकेच्या पथकाने पोलिसांच्या फौजफाट्यासह मंदिरातील मुर्ती हटविली व मुर्तीची विटंबना केली. मंदिराच्या ओट्याची तोडफोड करुन शेड जमीनदोस्त केले. या संबंधीची कारवाई कोणत्या अधिकार्याने केली व का केली याचा खूलासा करावा, अशी मागणी भरोसे यांनी केली.
यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य करणार्या अधिकार्यांविरुध्द कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis