सेलू आणि मानवत रोड या स्थानकांची एडीआरएम कल्याण राजू यांच्याद्वारे पाहणी; विकासकामांचा आढावा
परभणी, 25 मार्च (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक कल्याण राजू यांनी विविध स्थानके व सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांची पाहणी करून कार्यक्षमता, सुरक्षा मानके आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेतल
अ


परभणी, 25 मार्च (हिं.स.)।

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक कल्याण राजू यांनी विविध स्थानके व सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांची पाहणी करून कार्यक्षमता, सुरक्षा मानके आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अमृत भारत स्टेशन योजना (एबीएस) अंतर्गत विकसित होत असलेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू आणि मानवत रोड या स्थानकांचीही पाहणी केली.

या दौर्यात त्यांनी नागरसोल ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान रिअर विंडो निरीक्षण करून सुरू असलेल्या दुहेरीकरण कामांच्या प्रगतीची पाहणी केली. या कामांमुळे मार्गाची क्षमता वाढून गाड्यांची वेळपालनता सुधारण्यास तसेच प्रवासी व मालवाहतुकीस गती मिळण्यास मदत होणार आहे. दौर्यादरम्यान नागरसोल, रोटेगाव, परतूर, सेलू आणि मानवत रोड या अमृत भारत स्टेशन योजना (एबीएस) अंतर्गत विकसित होत असलेल्या स्थानकांची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था तसेच विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

राजू यांनी संबंधित अधिकार्यांशी संवाद साधून सुरक्षा, कार्यक्षम संचालन आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच विभागातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची प्रगतीही तपासण्यात आली. या पाहणीवेळी अभियांत्रिकी, संचालन, विद्युत, सुरक्षा तसेच सिग्नल व दूरसंचार विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नांदेड विभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा बळकटीकरण, प्रवासी सुविधा सुधारणा आणि सुरक्षित, कार्यक्षम रेल्वे सेवा देण्याच्या दृष्टीने ही पाहणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande