
अमरावती, 24 मार्च (हिं.स.)अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवेचा कारभार सध्या चव्हाट्यावर आला असून रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णालयात डॉक्टरांची उपस्थिती नसल्याने आरोग्य सेवकांकडूनच रुग्णांची प्राथमिक तपासणी करून औषधांची चिठ्ठी लिहून घेतली जात असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
तसेच काही वार्डांमध्ये चादरी अस्वच्छ अवस्थेत असल्याचे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचेही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे. रुग्णालयात दिलेल्या वेळेनुसार डॉक्टर उपस्थित नसल्याची तक्रारही समोर येत आहे.
अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र आवश्यक सुविधा आणि वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी