कोल्हापूरमध्ये विकास सेवा संस्थांसाठी पीक कर्ज व्याज सवलत – केडीसीसी बँकेची मोठी योजना
कोल्हापूर, २४ मार्च (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांसाठी आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने केडीसीसी बँकेने पीक कर्ज व्याजात २५% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जून २०२५ अखेर पीक कर्जासह मध्यम मुदत व इतर सर्व कर्ज वसूल
कोल्हापूर जिल्हा बँक


कोल्हापूर, २४ मार्च (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांसाठी आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने केडीसीसी बँकेने पीक कर्ज व्याजात २५% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जून २०२५ अखेर पीक कर्जासह मध्यम मुदत व इतर सर्व कर्ज वसूल केलेल्या १७० विकास सेवा संस्थांना सव्वा कोटी रुपयांची व्याज सवलत परत मिळणार आहे.

बँकेने ही योजना स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचे पीक प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत आखली आहे. बँकेच्या चालू आर्थिक वर्षातील ताळेबंदातील तरतुदींच्या माध्यमातून ही रक्कम विकास सेवा संस्थांना दिली जाणार आहे.सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या केडीसीसी बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सवलतीची घोषणा केली होती. बँकेच्या पीक कर्जासाठी विकास सेवा संस्थांना दर चार टक्के व्याज आकारले जाते, त्यापैकी २५% म्हणजेच एक टक्के व्याज परतावा या योजनेतून संस्थांना मिळणार आहे.योजनेचे उद्दिष्ट थकबाकी कमी करणे, विकास सेवा संस्थांना शंभर टक्के कर्ज वसुलीसाठी प्रोत्साहित करणे, कर्ज परतफेडीत शिस्त आणणे आणि इतर संस्थांनी त्याचे अनुकरण करणे, असे आहे.

बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले की, “विकास सेवा संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब पीक प्रोत्साहन अनुदान' ही अभिनव योजना राबविली आहे. चालू वसुली वर्षासाठीही दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ३० जून २०२६ अखेर अधिकाधिक विकास सेवा संस्थांनी शंभर टक्के कर्ज वसुली पूर्ण करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा.”

या प्रोत्साहनपर व्याज सवलतीमुळे विकास सेवा संस्थांना आर्थिक सक्षमता मिळणार असून, त्यांनी सभासद शेतकऱ्यांना लाभांश वाटप, प्रोत्साहनपर रक्कम देणे शक्य होईल. एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी चळवळीला या योजनेमुळे बळकटी मिळणार आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande