
पुणे, 24 मार्च (हिं.स.) क्षयरोगावर (टीबी) पूर्ण उपचार न घेतल्यास पुढील टप्प्यातील आणि क्षयरोगाच्या सामान्य उपचारांना दाद न देणारा क्षयरोग वाढतो. मात्र, अलीकडील काळात उपचारांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे औषधांना प्रतिरोधक ठरत असलेला ‘एमडीआर’ आणि ‘एक्सडीआर’ या प्रकारचा क्षयरोगदेखील बरा होत असल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या क्षयरोग विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत उपचार पूर्ण करून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढले आहे.
क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांच्या निदान आणि उपचारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाते. त्यांनी मध्येच उपचार बंद केल्यास त्यांना घरी जाऊन समुपदेशन केले जात. मध्यंतरी बुधवार पेठेतील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांच्या मदतीने समुपदेशन करून उपचाराचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी शहर क्षयरोग विभागाचे ६० कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यात क्षयरोगी रुग्णांना सर्वाधिक २४ हजार फूड बास्केट वाटप करण्यात पुणे महापालिका आघाडीवर आहे. असे पुणे महापालिका शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रशांत बोठे सांगितले . सर्वसाधारण क्षयरोग रुग्णांमध्येही उपचार यशदर २०२२ पासून ९४ टक्क्यांपर्यंत स्थिर राहिला. मृत्यूदरातही लक्षणीय घट झाली असून, २०२० मधील ७ टक्क्यांवरून तो २०२३ मध्ये दोन टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु