
अमरावती, 24 मार्च, (हिं.स.) - आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. मध्य पुर्वेतील तणावामुळे इंधनाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये इंधनाचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ४० टक्के आहे. इंधनाचा खर्च वाढल्याने विमान कंपन्यांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. त्याचा परिणाम मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेवरही झाला आहे.
अमरावती विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा १६ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली. अलायन्स एअरने सुरूवातीला अमरावती ते मुंबई प्रवासाचे तिकिटाचे किमान दर २ हजार १०० रुपये इतके ठेवले होते. पण, गर्दीच्या दिवशी जास्त रक्कम मोजावी लागत होती. सुरूवातीला आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आठवड्यातून चार दिवस विमान सेवा सुरू झाली. आता २९ मार्चपासून आठवड्यातून पाच दिवस विमानोड्डाण होणार आहे. पण, त्याचवेळी तिकिटाचे दर देखील महागले आहेत. आता कुठल्याही दिवशी अमरावती ते मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना ३ हजार ९८९ रुपये म्हणजे चार हजार रुपयांच्या जवळपास रक्कम मोजावी लागत आहे. आधी आकारण्यात येणाऱ्या किमान दराच्या दुप्पट ही रक्कम आहे.
आता आठवड्यातून पाच दिवस
मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आता येत्या २९ मार्चपासून आठवड्यातून पाच दिवस सुरू होणार आहे. दर रविवार, सोमवार, मंगळवारी, बुधवार आणि शुक्रवार असे पाच दिवस विमानोड्डाण होणार आहे. २९ मार्चपासून मुंबईहून विमान सकाळी ७.०५ वाजता उड्डाण घेईल आणि अमरावती विमानतळावर ८.५० वाजता पोहचले. त्यानंतर अमरावतीहून सकाळी ९.१५ वाजता विमानोड्डाण होईल आणि मुंबईला ११.०० वाजता पोहचेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी