
रायगड, 24 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सत्य साई संजीवनी केंद्र येथे अत्याधुनिक आरोग्य सेवा केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामार्फत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत टू-डी-इको तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली.
या शिबिरांद्वारे जिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकूण २,५०७ तपासण्या करण्यात आल्या, तर जन्मजात हृदयरोगग्रस्त ३,२२६ बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील बालकांनाही अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर व सातारा जिल्ह्यातील जावळी या आदिवासी भागांमध्ये विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरी भागातही पुण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येत आहेत, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातही आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बालकांमधील जन्मजात हृदयरोग तपासणीसाठी मेगा शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. नवी मुंबई परिसरात बांधकाम व वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत असून अंगणवाडी सेविकांसाठी कर्करोग व इतर आजारांच्या तपासणीचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
याशिवाय, आशा, अंगणवाडी सेविका, परिचारिका व वैद्यकीय अधिकारी अशा ३५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना क्षमता विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकूणच, या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक बनत असून माता व बाल आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)