
रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व प्रकल्प अधिकारी पदांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्तता असल्याचे चित्र समोर आले आहे. फेब्रुवारी २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ८१ अंगणवाडी सेविका, ४२ पर्यवेक्षिका आणि १० प्रकल्प अधिकारी पदे रिक्त असून याचा परिणाम बालविकास व पोषण योजनांच्या अंमलबजावणीवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) पदांची एकूण १६ पदे मंजूर असताना त्यापैकी केवळ ६ पदे भरलेली असून १० पदे रिक्त आहेत. पर्यवेक्षिका पदांमध्ये १०६ पैकी ६४ पदे भरलेली तर ४२ पदे रिक्त आहेत. यामुळे अंगणवाडी केंद्रांच्या देखरेख व मार्गदर्शनात अडचणी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
अंगणवाडी सेविका पदांमध्ये एकूण ३१६९ पदांपैकी ३०८० पदे भरलेली असली तरी ८१ पदे रिक्त आहेत. महाड, माणगाव, पोलादपूर, श्रीवर्धन आणि पेण तालुक्यांमध्ये रिक्त पदांचे प्रमाण अधिक असून काही ठिकाणी बालकांच्या पोषण आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण सेवांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र रोहा तालुक्यात सर्व पदे भरलेली असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
अंगणवाडी केंद्रे ही बालकांच्या पोषण, आरोग्य तपासणी आणि शिक्षणासाठी महत्त्वाची कडी मानली जातात. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून सेवांचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील नागरिक व स्थानिक प्रतिनिधींनी रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. अंगणवाडी सेविका महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधी जिविता पाटील यांनी सांगितले की, अनेक सेविका १० ते २५ वर्षे अल्प मानधनावर सेवा देत असून अंतर्गत भरतीची प्रक्रिया गेली १५ वर्षे प्रलंबित आहे. ही भरती तातडीने राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
एकंदरीत, रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी व्यवस्थेत मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत असून प्रशासनाने तातडीने भरती प्रक्रिया राबवून ही पदे भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)