
सोलापूर, 24 मार्च (हिं.स.) : सोलापूर महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या वार्षिक अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिमखाना येथे बैठक पार पडली.
या बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञनेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापालिकेच्या नियोजनानुसार विभागनिहाय अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार आज कर आकारणी व कर संकलन विभाग तसेच भूमी व मालमत्ता विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.मंडई व कोंडवाडा विभाग तसेच आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभाग, दि. २५ मार्च रोजी नगर अभियंता व नगररचना (बांधकाम परवाना), विद्युत, सामान्य प्रशासन आणि उद्यान विभाग, दि. २६ मार्च रोजी सार्वजनिक आरोग्य अभियंता विभाग व पझोन क्र. १ ते ८, दि. २७ मार्च रोजी परिवहन विभाग व मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ, तर दि. २८ मार्च रोजी महिला व बाल कल्याण, मुख्यलेखापरीक्षक, नगरसचिव, पशुवैद्यकीय व दिव्यांग कल्याण विभागांवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, या सर्व बैठका दररोज सकाळी १० वाजल्यापासून आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक विभागाने जबाबदारीने व पारदर्शकतेने काम करणे आवश्यक आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी निधीचा नियोजनबद्ध वापर करून विकासकामांना गती दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड