खोपोलीत ट्रान्सपोर्ट चालकाला मारहाण; गुन्हा दाखल
रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ट्रान्सपोर्ट चालक व साक्षीदारांना मारहाण करत जबरदस्तीने तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला
खोपोलीत ट्रान्सपोर्ट चालकाला मारहाण; गुन्हा दाखल


रायगड, 24 मार्च, (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ट्रान्सपोर्ट चालक व साक्षीदारांना मारहाण करत जबरदस्तीने तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीतील सागर ट्रान्सपोर्ट ऑफिस व पटेलमार्टजवळील एसबीआय एटीएम परिसरात घडली. फिर्यादी हे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून ते बालाजी रोड कॅरिअर प्रा. लि. या कंपनीचे आयशर पुलर वाहन घेऊन रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हेसल मशीन नागोठणे येथे घेऊन जात होते.

दरम्यान, खोपोलीजवळ पुलाच्या मागील बाजूस वाहन थांबले असता आरोपींनी संगनमत करून चालक व साक्षीदारांना सागर ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनजवळ वाहन लावण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये नेऊन हाताबुक्क्यांनी व प्लास्टिकच्या पाईपने मारहाण करण्यात आली. वाहन पास करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला 2 लाख रुपयांची खंडणी मागितली.

नंतर आरोपींनी 1 लाख 30 हजार रुपयांवर तडजोड दर्शवली. फिर्यादींकडे रोख रक्कम नसल्याने त्यांना जबरदस्तीने एटीएममध्ये नेऊन पैसे काढण्यास भाग पाडण्यात आले. तसेच फोनपे द्वारेही रक्कम ट्रान्सफर करून घेतली. आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांना धमकावत पैसे मिळेपर्यंत ऑफिसमध्येच बेकायदेशीरपणे अडवून ठेवले होते.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 101/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करीत आहेत. या घटनेमुळे खोपोली परिसरात खळबळ उडाली असून ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande