लातूर - फसवणूक करणारा सराईत तोतया पोलीस आरोपी जेरबंद
लातूर, 24 मार्च (हिं.स.)। पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून देतो म्हणून फसवणूक करणारा सराईत तोतया पोलीस आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कौशल्यपूर्ण कारवाई – ₹४.३० लाखांची रोख रक्कम जप्त, इतर गुन्ह्यांचा तपास सुरू
तोतया पोलीस


लातूर, 24 मार्च (हिं.स.)। पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून देतो म्हणून फसवणूक करणारा सराईत तोतया पोलीस आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कौशल्यपूर्ण कारवाई – ₹४.३० लाखांची रोख रक्कम जप्त, इतर गुन्ह्यांचा तपास सुरू

लातूर जिल्हा पोलीस दलाने, सामान्य नागरिकांची दिशाभूल करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत आरोपीकडून ₹४,३०,०००/- (चार लाख तीस हजार रुपये) इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपीकडून इतर जिल्ह्यांतील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात अलीकडील काळात काही फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी सदर चे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सक्रियपणे काम करीत होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर शहर परिसरात संशयितरित्या आरोपींचा शोध घेत असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, नवीन रेणापूर नाका, लातूर येथे एक इसम स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करीत आहे.

ही माहिती खात्रीशीर असल्याने पोलिस पथकाने तात्काळ नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून

संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव

1) विजय अनिरुद्ध कदम (वय २५ वर्षे), रा. पोस्ट कॉलनी, साई मंदिर जवळ, पेडगाव रोड, परभणी

असे सांगितले. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ₹४,३०,०००/- रोख रक्कम मिळून आली. सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सखोल चौकशीदरम्यान आरोपीने अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली की, आरोपी वर्तमानपत्रातील चोरीच्या घटनांची माहिती गोळा करत असे. त्यानंतर संबंधित फिर्यादींचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधून स्वतःला “पोलीस अधिकारी” असल्याचे सांगून स्वतःचा यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीला जाते वेळीचा व्हिडिओ दाखवून पोलीस अधिकारी असल्याची खात्री पटवत असे तसेच बनावट पंचनामा तयार करून त्यावर स्वतःचे नाव संदीप कदम सपोनी असे टाकून स्वतःची व फिर्यादीची सही घेत असे व चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत या बहाण्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम उकळत असे.

अहमदपूर येथील एका फिर्यादीस आरोपीने अशाच प्रकारे संपर्क करून “मी पोलीस अधिकारी आहे, तुमचे चोरी गेलेले सोने परत मिळवून देतो” असे सांगून ₹५,००,०००/- रक्कम फसवणूक करून घेतली. त्यापैकी ₹७०,०००/- आरोपीने खर्च केले असून उर्वरित ₹४,३०,०००/- रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

आरोपीने कबुली दिली आहे की, तो मागील दोन वर्षांपासून नांदेड व परभणी जिल्ह्यात अशाच प्रकारे फसवणूक करीत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आरोपीकडून इतर गुन्ह्यांची माहिती घेऊन संबंधित पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून तपास सुरू करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन अहमदपूर, जि. लातूर येथे गुरनं १४२/२०२६ कलम ३१८(४), ३१६(२), ३१९(२) भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख,पोलीस अंमलदार संजय कांबळे, सुरेश कलमे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, शैलेश सुडे, पाराजी पुटटेवाड, तुळशीराम बरुरे, महिला पोलिस अंमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे हजर करण्यात आले आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की —कोणतीही व्यक्ती स्वतःला पोलीस अधिकारी आहे अशी खोटी ओळख देऊन पैसे मागत असल्यास त्वरित सतर्क व्हावे आणि अशी संशयास्पद व्यक्ती किंवा घटना आढळून आल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande