
नांदेड, 24 मार्च, (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) प्रवासी सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेसाठी पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध केली. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत वाशीम रेल्वेस्थानकावर घरातून पळून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची सुटका केली. हेड कॉन्स्टेबल एस.एम. बालखंडे यांना रेल्वेमध्ये गस्त घालताना ही मुले घाबरलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी तत्काळ चाइल्ड हेल्पलाइन (१०९८) ला माहिती देत पालकांचा शोध सुरू केला. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी समुपदेशन व पडताळणी केल्यानंतर मुलांना पुढील काळजी व पुनर्वसनासाठी चाइल्ड हेल्पलाइनकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले.
दरम्यान, 'ऑपरेशन अमानत' अंतर्गत नांदेड रेल्वेस्थानकावर हेड कॉन्स्टेबल एस. श्रीधर यांनी ट्रेन क्रमांक ११००१ एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने विसरलेले आठ हजार रुपये किमतीचे घड्याळ शोधून मालकाला परत केले. तसेच जालना रेल्वेस्थानकावर कॉन्स्टेबल संदीप जाधव यांनी बेवारस बॅग शोधून काढली. त्यामध्ये मोबाइल, औषधे होती. योग्य पडताळणीनंतर ती बॅग संबंधित प्रवाशाला सुपूर्द केली. 'ऑपरेशन यात्री सुरक्षा' अंतर्गत पूर्णा जंक्शन येथे आरपीएफ व सरकारी रेल्वे पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. तो चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना पकडले. पुढील तपासात त्याचा संबंध ट्रेन क्रमांक १८५०४ एक्स्प्रेसमधील सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या वस्तू चोरी प्रकरणाशी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis