
नाशिक, 24 मार्च (हिं.स.)। जिल्हा परिषद नाशिकचा सन २०२५-२६ चा सुधारित अर्थसंकल्प तसेच सन २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक ओमकार पवार यांच्यासमोर सादर करण्यात आला असून, यामध्ये विकासाभिमुख आणि नाविन्यपूर्ण योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे.
सन २०२५-२६ साठी मूळ अर्थसंकल्प रु. ६०.८३ कोटी इतका होता. त्यामध्ये सुधारित अपेक्षित जमा रु. ६३.४७ कोटी असून, सुधारित अर्थसंकल्प रु. ७५.९८ कोटी करण्यात आला आहे. थकीत मुद्रांक शुल्कापोटी रु. १५.०० कोटी प्राप्त झाल्यामुळे जमेमध्ये वाढ झाली असून, त्यानुसार खर्चातही वाढ करण्यात आली आहे. सन २०२६-२७ साठी मूळ अर्थसंकल्प रु. ५९.१४ कोटी प्रस्तावित आहे. मात्र, अपेक्षित जमा रु. ३५.५० कोटी इतकीच असून VPDA प्रणालीमुळे व्याजाच्या उत्पन्नात लक्षणीय घट झाली असून मागील शिल्लक निधीचा समावेश केल्याने खर्चाची तरतूद वाढविण्यात आली आहे.
विभागनिहाय तरतुदींमध्ये शिक्षण विभागासाठी रु. ८.७१ कोटी, आरोग्य विभागासाठी रु. १.९२ कोटी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागासाठी रु. ५.०० कोटी, समाजकल्याणासाठी रु. ४.४७ कोटी, दिव्यांग कल्याणासाठी रु. २.५३ कोटी, महिला व बालकल्याणासाठी रु. २.४५ कोटी, कृषि विभागासाठी रु. ३.५० कोटी, पशुसंवर्धनासाठी रु. ३.६८ कोटी, लघुपाटबंधारेसाठी रु. १.२१ कोटी तर इतर विभागांसाठी रु. २५.६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यावर्षी जि.प. सेस अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शाळा स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम, ‘सुपर २५’ क्रीडा प्रबोधिनी व ‘सुपर १००’ निवासी प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. समाजकल्याण अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल, वसतीगृह सुविधा, तृतीयपंथी व दुर्बल घटकांसाठी अनुदान, तसेच दिव्यांगांसाठी स्वयंपूर्ण रोजगार व तंत्रज्ञान प्रशिक्षण यांचा समावेश आहे.
कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रात ड्रोनद्वारे फवारणी, कृषि मेळावे, दूध काढणी यंत्र अनुदान, तसेच भटक्या श्वानांचे निर्बीजिकरण यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. महिला व बालकल्याण विभागांतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन, व्यावसायिक प्रशिक्षण, अंगणवाडी गणवेश योजना यांचा समावेश आहे.
याशिवाय, नवचेतना अभियान, शहीद जवानांच्या कुटुंबांना सहाय्य, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणीसारख्या योजनांमुळे सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे.
यावेळी नाशिक जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक ओमकार पवार म्हणाले की, “जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आला असून शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच कृषि क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना व दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपलब्ध निधीचा प्रभावी व पारदर्शक वापर करून नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV