
मुंबई, 24 मार्च, (हिं.स.)। चोपडा शहरातील रत्नावती नदीलगतच्या पूररेषा क्षेत्रात बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार असून त्याबाबतचे निर्देश लवकरच जारी केले जातील, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
चोपडा शहराची विकास योजना २० मे २०१६ पासून लागू असून रत्नावती नदीलगत पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत उच्चतम पूररेषेत किमान २.५ मीटर उंचीचे (स्टील्ट) बांधकाम बंधनकारक आहे. मात्र २००६ नंतर मोठा पूर आलेला नसल्याने ही अट शिथील करून ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना सदस्य चंद्रकांत सोनवणे यांनी मांडली.
चोपडा शहर विकास योजनेनुसार उच्चतम पूररेषेत २.५ मीटर उंचीचे (स्टील्ट) बांधकाम बंधनकारक होते. मात्र, एकसंध विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू झाल्यानंतर या संदर्भातील पूर्वीच्या तरतुदी रद्द ठरतात. युडीसीपीआरमध्ये स्पष्टपणे ०.४५ मीटर उंचीची तरतूद नमूद असल्याने, सदस्यांच्या मागणीनुसार तीच तरतूद चोपडा शहरासाठी लागू करण्यात येणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर