
अमरावती, 25 मार्च (हिं.स.) । मेळघाटातील रस्ते, पाणी, दळणवळण व आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मेळघाटातील विविध समस्यांवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला बच्चू कडू मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शासनाने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केल्याने बँकांनी शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा लावू नये, अशा सूचना देण्याबाबतही चर्चा झाली. मनरेगा अंतर्गत दहा गावांचे पाच वर्षांचे एकत्रित नियोजन, इंटरनेट नसलेल्या गावांसाठी हजेरीची पर्यायी व्यवस्था आणि मजुरी वेळेवर देण्यावर भर देण्यात आला. वनक्षेत्रामुळे रस्ते सुधारण्यासाठी वन विभागाच्या परवानगीची गरज असल्याने त्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच सिंचन व वीज प्रकल्पांमुळे स्थलांतर कमी होऊन शेती उत्पादन वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी