
अमरावती, २५ मार्च (हिं.स.) :राज्यात सर्वांना हक्काचे घर देण्याच्या घोषणा केल्या जात असताना तिवसा तालुक्यात मात्र घरकुल योजनांचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. अनुसूचित जाती, जमाती, बंजारा, पारधी आणि भराडी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांचे लक्ष्य पूर्ण झाल्याचे कारण देत शेकडो लाभार्थ्यांना हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात आहे.
या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, येत्या १० दिवसांत प्रलंबित हप्ते न मिळाल्यास पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिला आहे.
राज्य आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजना, छबरी आवास योजना, पारधी आवास योजना यांसारख्या विविध घरकुल योजना बंद करण्यात आल्यामुळे तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी, शिवणगाव, शेंदोळा बुद्रुक, शेंदोळा खुर्द, धोत्रा, वर्हा, मार्डी आदी गावांतील अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण अवस्थेत आहेत.
घरकुल मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांनी जुनी घरे पाडून नवीन बांधकाम सुरू केले आहे. मात्र, शासनाकडून पहिला हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात हप्त्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, येत्या ७ जूनपासून मृग नक्षत्रासह पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापूर्वी घरे पूर्ण न झाल्यास अनेक कुटुंबांना उघड्यावर राहण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून “लक्ष्यांक संपला” हे तांत्रिक कारण देण्यात येत असले तरी, पावसाळ्यात नागरिकांनी राहायचे कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
या वेळी स्वप्नील तुरकाने, पंकज वानखडे, मंगेश पाचघरे, विजय डोंगरे, दिपक वाडीभसमे, अनिल मेश्राम, अमोल वावरे, जयंत कावरे, गंगाधर भालेराव तसेच वंचितचे पदाधिकारी सागर भवते यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी