अमरावती महापालिकेच्या अंदाजपत्रकात ३५ कोटींची वाढ सुचवली
नगरसेवक निधीत तिपटीने वाढीची शिफारस अमरावती, २५ मार्च (हिं.स.) : महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीने महत्त्वपूर्ण बदल सुचवत उत्पन्नात सुमारे ३५ कोटी रुपयांची वाढ करण्याची शिफारस केली आहे. या वाढीमुळे महाप
वार्डविकास निधी १० लाखांहून ३० लाख स्थायी समितीची सूचना


नगरसेवक निधीत तिपटीने वाढीची शिफारस

अमरावती, २५ मार्च (हिं.स.) :

महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीने महत्त्वपूर्ण बदल सुचवत उत्पन्नात सुमारे ३५ कोटी रुपयांची वाढ करण्याची शिफारस केली आहे. या वाढीमुळे महापालिकेचे एकूण उत्पन्न ४७३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मंगळवारी स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती अविनाश मार्डीकर होते. बैठकीत विविध उत्पन्न स्रोतांचा आढावा घेत मुद्रांक शुल्क, वाहनतळ, जन्म-मृत्यू दाखले, खुले भूखंड, मालमत्ता कर आणि वृक्ष कर या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचे पर्याय सुचविण्यात आले.

विशेष म्हणजे, नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या वार्ड विकास स्वेच्छा निधीत मोठी वाढ सुचवण्यात आली आहे. सध्या १० लाख रुपये असलेला निधी वाढवून ३० लाख रुपये प्रति नगरसेवक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खर्चाच्या बाजूने सुमारे २८.५० कोटी रुपयांची वाढ अपेक्षित आहे.

महापालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे यापूर्वी वार्ड विकास निधीत कपात करण्यात आली होती. २०२१-२२ मध्ये हा निधी २० लाखांवरून २५ लाख करण्यात आला होता. मात्र, कोरोना काळात निधी वितरणात अडचणी निर्माण झाल्या. नंतर निधी कमी करून ५ लाख रुपये करण्यात आला होता.

प्रशासनाने सुरुवातीला ४३७.६६ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. मात्र स्थायी समितीच्या शिफारसीनंतर हे उत्पन्न ४७३.२४ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या बदलांमुळे महापालिकेच्या आर्थिक नियोजनात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande