
नांदेड, 25 मार्च (हिं.स.) : कंधार तालुक्यातील पानशेवडी येथे सुसज्ज इमारतीअभावी अडचणीत सापडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अखेर दिलासा मिळाला असून, स्थानिक दानशूर राम देवराव मोरे यांनी दिलेल्या जमिनीवर नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
पानशेवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अडीच दशकांपासून ग्रामपंचायतीच्या लहानशा इमारतीत सुरू होते. अपुरी जागा, वाढती लोकसंख्या आणि विविध आजारांवरील उपचारांची गरज यामुळे रुग्णसेवा देताना अनेक अडचणी येत होत्या. डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध असूनही आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना योग्य सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत होते.
ही परिस्थिती पाहून व्यथित झालेल्या राम मोरे यांनी समाजहिताचा विचार करून आपल्या मालकीची ३ एकर १० गुंठे जमीन आरोग्य केंद्रासाठी दान दिली. त्यांच्या या उदात्त निर्णयामुळे पानशेवडी येथे आधुनिक आणि सुसज्ज अशी भव्य इमारत उभी राहिली आहे.नुकताच या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला असून, आता येथे विविध विभाग कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा गावातच उपलब्ध होणार आहेत. यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणारे अंतर, वेळ आणि खर्च यांची बचत होणार आहे. विशेषतः महिला आणि वृद्ध रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रसंगी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राम मोरे यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या भावना व्यक्त करताना राम मोरे यांनी सांगितले की, “परिसरातील रुग्णांची होणारी गैरसोय पाहून मन व्यथित होत होते. समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून रुग्णांना सेवा मिळणार असल्याने समाधान मिळत आहे.”
पानशेवडी व परिसरातील गावांमधून या उपक्रमाचे स्वागत होत असून, भविष्यातही अशा समाजोपयोगी कार्यांना चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis