
अकोला, २५ मार्च (हिं.स.) : गेल्या २१ मार्च रोजी ईदच्या दिवशी नांदेड येथील ईदगाहजवळ नमाजाच्या वेळी दुचाकीला आग लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश संघटक सचिव जावेद जकारिया यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनावर मंत्रालय, मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयाने कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाने दिलेल्या उत्तरानुसार, जावेद जकारिया यांचा ई-मेल प्राप्त झाला असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी व आवश्यक कार्यवाहीसाठी तो गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, २१ मार्च रोजी ईदच्या नमाजादरम्यान ईदगाह परिसरात एका दुचाकीला अचानक आग लागली होती. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी स्फोटासारखे आवाज ऐकू आल्याचे सांगितल्याने या प्रकरणाबाबत विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर जावेद जकारिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे या घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच एटीएस, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने हे प्रकरण गृह विभागाकडे वर्ग केल्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे