
अकोला, २५ मार्च (हिं.स.) : आगामी श्री रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माना पोलीस स्टेशनतर्फे ग्राम कुरुम येथे रूट मार्च काढण्यात आला.
बुधवार, दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:५० ते ६:३० या वेळेत हा रूट मार्च पार पडला. ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात माना पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी, १५ पोलीस अंमलदार तसेच १८ होमगार्ड यांनी सहभाग घेतला.
या रूट मार्चचा मुख्य उद्देश ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच शांतता आणि सलोखा राखण्याचा संदेश देणे हा होता. यावेळी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत आगामी सण शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले.
पोलीस प्रशासनाकडून अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे