धर्माबादमध्ये घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा; नागरिक त्रस्त
नांदेड, 25 मार्च (हिं.स.) : धर्माबाद शहरात घरगुती एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दररोज उपलब्ध होणारे सुमारे ३४० सिलिंडर काही तासांतच संपत असल्याने २० हजारांहून अधिक ग्राहका
धर्माबादमध्ये घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा; नागरिक त्रस्त


नांदेड, 25 मार्च (हिं.स.) : धर्माबाद शहरात घरगुती एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दररोज उपलब्ध होणारे सुमारे ३४० सिलिंडर काही तासांतच संपत असल्याने २० हजारांहून अधिक ग्राहकांपैकी अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

या तुटवड्याचे मुख्य कारण म्हणजे व्यावसायिकांकडून घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला गैरवापर असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमानुसार हॉटेल, ढाबे, फास्टफूड सेंटर आणि चहा टपऱ्यांनी कमर्शियल गॅसचा वापर करणे आवश्यक असतानाही प्रत्यक्षात घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे चित्र आहे.

स्थानिकांच्या मते, सुमारे १५० व्यावसायिकांकडे चार-चार सिलिंडरचा साठा असल्याची चर्चा असून पुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांना गॅससाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरम्यान, गॅस उपलब्ध न झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने रस्त्यावर सिलिंडर आपटत आपला निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande