
रायगड, 25 मार्च (हिं.स.)। अलिबाग : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारी आयोजित मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमादरम्यान क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम पार पडला.
यावेळी राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या ‘निक्षय मित्र’ांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी टीबी डे साजरा करत क्षयरुग्णांना पोषण आहार किट (फूड बास्केट) वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास उपाध्यक्ष मधुकर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री संजना काळे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, सभापती वैकुंठ पाटील, नारायण डामसे, रसिका केणी, मानसी दळवी, अमित नाईक, जनार्दन भस्मा, प्रभाकर म्हात्रे, संतोष बैलमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. पथनाट्य सादर करून क्षयरोगाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यावेळी उपस्थितांना ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ची शपथ देण्यात आली. विविध उपक्रमांद्वारे “टीबी मुक्त जिल्हा” करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)