
मुंबई, 25 मार्च (हिं.स.) : राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये हरित उर्जेचा वापर वाढविणे व वीज खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT) यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराच्या माध्यमातून सौरऊर्जा, स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, ऊर्जा साठवण (Energy Storage) तसेच ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानांचा वापर करून शैक्षणिक परिसरातील ऊर्जा वापर कमी करणे व कार्बन फुटप्रिंट घटविणे यावर भर देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये, तंत्रनिकेतने तसेच इतर शासकीय संस्थांच्या इमारतींच्या छतांवर व उपलब्ध मोकळ्या जागांवर सौरऊर्जा संयंत्रे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांची अंमलबजावणी MAHAPREIT मार्फत RESCO (Renewable Energy Service Company) मॉडेलद्वारे केली जाणार असून, यासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही.
MAHAPREIT कडून आवश्यक सर्वेक्षण, तांत्रिक अभ्यास, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे आणि प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल. तर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून संबंधित संस्थांची माहिती उपलब्ध करून देणे, समन्वय साधणे तसेच आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळविण्यास सहकार्य केले जाईल.
याशिवाय, सौरऊर्जा व इतर नूतनीकरणीय तंत्रज्ञान क्षेत्रात तांत्रिक अभ्यासक्रम विकसित करणे, कौशल्यविकासाला चालना देणे तसेच NABL मान्यताप्राप्त अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळा उभारण्यासाठीही दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करणार आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या हरित ऊर्जा धोरणानुसार पारंपरिक उर्जेचा वापर कमी करून पर्यावरणपूरक उर्जा वापर वाढविण्याच्या दिशेने हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी