
बीड, 25 मार्च (हिं.स.)।
राज्यातील दिव्यांग शाळांचे अनुदान धोरण जाहीर करूनही प्रत्यक्षात शाळा बंद पाडल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. या अन्यायकारक धोरणाविरोधात ७ एप्रिल रोजी मंत्रालयावर 'तीव्र आक्रोश मोर्चा' काढण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
डॉ. ओव्हाळ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की, १६ जुलै २०२४ रोजी अनुदान धोरण जाहीर केल्यानंतर शाळांना अनुदान देण्याऐवजी त्या बंद का केल्या जात आहेत? नागपूर, बीड, पुणे, सांगली आणि लातूरमधील अनेक शाळा बंद झाल्याने शेकडो दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांचा आणि रस्त्यावर आलेल्या शिक्षकांचा ठावठिकाणा आयुक्त व सचिवांना ठाऊक आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आयुक्त सत्यजित बडे यांची भूमिका संशयास्पद असून निरीक्षक भारत कांबळे यांनी समायोजन आदेश वितरणात मोठा घोटाळा केल्याचा आरोपही डॉ. ओव्हाळ यांनी केला. डोळे झाकून काढल्या जाणाऱ्या या आदेशांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अनुदान धोरण राबवावे आणि भ्रष्टाचार थांबवावा, यासाठी ७ एप्रिलचा मोर्चा निर्णायक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis