
जळगाव, 25 मार्च (हिं.स.)अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी परिसरात ७२ वर्षीय जयराम धर्मानी यांचा क्रेनच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. जयराम धर्मानी हे नेहमीप्रमाणे बाजारातून आपल्या घरी परतत होते. ते पायी चालत सायकल हातात घेऊन जात असताना मागून वेगात येणाऱ्या क्रेनने त्यांना अचानक धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की धर्मानी यांना सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. सिंधी समाजासह परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत निषेध नोंदवला. नागरिकांच्या मते, अमळनेर-चोपडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. या घटनेनंतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचा निषेध करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणे, जड वाहनांवर नियंत्रण आणणे आणि अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करणे या मागण्या जोर धरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर