
बीड, 25 मार्च (हिं.स.)।
जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अपघातग्रस्तांना शासकीय मदत आणि विमा लाभ जलद मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन हाय-एंड टॅब्सचे वितरण करण्यात आले. या आधुनिक उपक्रमामुळे रस्ते अपघातातील जखमी आणि मृतांच्या वारसांना 'प्रधानमंत्री राहत निधी' तसेच विविध विमा योजनांचा लाभ मिळणे आता अधिक सुलभ होणार आहे.
केंद्र शासनाच्या 'आयआरएडी' आणि 'ई-डीएआर' या प्रणालींमध्ये अपघाताची अचूक माहिती आता थेट घटनास्थळावरूनच नोंदवता येणार आहे. नवीन टॅब्सच्या वापरामुळे माहिती भरण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कमालीचा वेग येईल, परिणामी तांत्रिक कारणांमुळे नागरिकांचे विमा दावे प्रलंबित राहणार नाहीत. या वितरण कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना अधिक 'स्मार्ट' आणि तत्पर सेवा देण्यासाठी बीड पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis