
रत्नागिरी, 25 मार्च, (हिं. स.) : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे हे सलग तिसरे वर्ष आहे. दि. १७ ते २६ एप्रिल या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर होणार असून, त्यानंतर दि. २७ एप्रिल रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात येथे शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांच्या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषद शाखेचे दोन वर्षांपूर्वी पुनरुज्जीवन झाल्यानंतर शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळाली आहे.
बालनाट्य शिबिर, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांची कार्यशाळा, महिलांच्या गायनाचा ‘स्वर तरंग’, ‘आनंदयात्री पुल’ अशा एकूण २८ कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दरवर्षी बालनाट्य शिबिर आयोजित करण्याची परंपराही जपली जात आहे. यंदा पुण्यातील प्रा. रश्मी नंदकुमार देव या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
प्रा. देव या पुण्यात एमईएसओ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे नाट्य विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी एम.ए. फिलॉसॉफी, एम.ए. इंडोलॉजी, एम.ए. नाट्यशास्त्र, तसेच हेरिटेज मॅनेजमेंट डिप्लोमा आणि सर्टिफाइड योगा इन्स्ट्रक्टर अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे.
त्या गेली २० वर्षे मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी, तसेच मीडिया क्षेत्रात अभिनेत्री, दिग्दर्शिका, माहितीपट निर्माती आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. देशाची कला, इतिहास आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘गाभारा’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी अनेक व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांत भूमिका साकारल्या असून, ३५ हून अधिक माहितीपटांची संकल्पना, दिग्दर्शन आणि संकलन केले आहे.
चिपळूणच्या शिबिरातून तयार करण्यात आलेले बालनाट्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर करण्यात येणार आहे. वय वर्षे ७ ते १७ या वयोगटातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या खजिनदार ॲड. विभावरी रजपूत (७७९६७२९५८७), दिलीप आंब्रे (8291089302) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी