
प्रशासनाने दिला संयम राखण्याचा सल्ला
रायगड, 25 मार्च (हिं.स.) : कर्जत तालुक्यात आज सकाळपासून पेट्रोल संपल्याची अफवा पसरल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून वाहनांच्या टाक्या भरण्यास प्रयत्न करत आहेत.
काही ठिकाणी तात्पुरता इंधन तुटवडा जाणवल्याने आणि क्रेडिट पुरवठा अडचणींमुळे पेट्रोल उपलब्ध नसल्याच्या चर्चा देखील होऊ लागल्या, ज्यामुळे परिस्थिती आणखी गोंधळाची बनली. मात्र, पेट्रोल पंप चालकांनी स्पष्ट केले आहे की सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नवीन टँकर लोडही येत आहेत. कोणतीही वास्तविक टंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस प्रशासन सकाळपासून पेट्रोल पंपांवर आपले कर्तव्य बजावत आहे, जेणेकरून कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवू नये. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी. सध्याच्या घडीला तालुक्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून घाबरण्याचे काही कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)