
बीड, 25 मार्च (हिं.स.)।
येथील मीना बाजार परिसरात मुलींची छेड काढणाऱ्या १९ टवाळखोरांवर दामिनी पथकाने धडक कारवाई करून त्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार दिवसांपासून ही विशेष मोहीम राबवण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असताना पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे हुल्लडबाजांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना मुलींचा पाठलाग आणि अश्लील खुणा केल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने साध्या वेशात गस्त घालून टवाळखोरांना रंगेहात पकडले. ताब्यात घेतलेल्या या तरुणांवर मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ११० आणि ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांचे कठोर समुपदेशनही करण्यात आले आहे. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने या कारवाईद्वारे दिला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis