
पुणे, 25 मार्च (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवले पुलाला जोडणारा देहूरोड ते सुतारवाडी असा सुमारे १५.८७ किलोमीटर लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी पार्कसह लगतच्या उपनगरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या सद्यस्थिती बाबत सभागृहात प्रश्न विचारण्यात आला होता. या अनुषंगाने आमदार शंकर जगताप यांनी नवले ब्रिज पासून सुतारवाडी ते देहूरोड या एलिव्हेटेड कॉरिडॉर संदर्भातील कामाबाबत विचारणा केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु