
लातूर, 25 मार्च (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी देविदास काळे यांची नियुक्ती केल्यानंतर आज त्यांचा पदभार समारंभ भव्य रूपाने पार पडला. भाजपा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व भाजपा लातूर शहर अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला. या पदभार समारंभ प्रसंगी प्रशासनाच्या वतीने आयुक्त मानसी मीना यांनी देविदास काळे यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनीही डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, अजित पाटील कव्हेकर आणि आयुक्त मानसी मीना यांचा सत्कार केला.
विरोधी पक्षनेते देविदास काळे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना भाजपा शहर अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर म्हणाले, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. भाजपा पक्ष लोककल्याणासाठी केंद्रबिंदू म्हणून काम करते. मनपात आज लोककल्याणकारी कार्यालयाची सुरुवात झाली असून, या कार्यालयात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामे होणार आहेत, त्यामुळे या विरोधी पक्ष नेते दालनाला 'कार्यकर्ता मंदिर' म्हणून पाहिले पाहिजे. या कार्यकर्ता मंदिरातून प्रत्येक कार्यकत्यांना न्याय मिळेल आणि लातूरकरांनाही न्याय मिळवून देण्याचे काम इथून होणार आहे.
ते पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष नेते देविदास काळे यांच्या माध्यमातून होणार आहे. भाजपचे प्रत्येक कार्यकर्ते या कार्यालयात भेट देऊन आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. आयुक्त मानसी मीना यांना उद्देशून त्यांनी विनंती केली की, भाजपा कार्यकर्ते आणि नगरसेवकांच्या कामांना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांना न्यायिक भूमिका देण्याचे काम आपल्या माध्यमातून व्हावे
त्यानंतर बोलताना भाजपा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, आज महत्त्वाचा दिवस आहे. देविदास काळे यांच्या माध्यमातून लोककल्याणकारी कामे होतील. सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावी काम करून आपण लातूरकरांचे मन जिंकावे. विरोधी पक्षाचे दालन सर्वांसाठी खुले आहे आणि येथे २४ x ७ तास काम केले जाईल. त्यांनी हरलेल्या उमेदवारांना संबोधित करताना म्हटले, जे मनपा निवडणुकीत हारले त्यांना मी 'हारले' म्हणणार नाही, तर 'लढले' असे म्हणेन, त्यांनीही आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याशी संपर्क साधावा. आपल्या कामातून सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी तोडावी.
ते पुढे म्हणाल्या, राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्ताधाऱ्यांची कामे शहराच्या विकासाला खीळ घालणारी आहेत, हे जिल्हा नियोजन समितीच्या
कामांना स्थगिती देऊन दाखवले आहे. येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करावे लागेल. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी विश्वास दिला की, प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहा, अडचण आली तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. देविदास काळे यांचे आक्रमक आश्वासन
पदभार स्वीकारताना आणि सत्काराला उत्तर देताना देविदास काळे म्हणाले, येणाऱ्या काळात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लातूरकरांच्या प्रश्नांसाठी भाजपा आक्रमकपणे काम करणार आहे. साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय काळातून प्रशासन बाहेर आले नाही, त्यांनाही जाच विचारला जाईल. पालिकेला आर्थिक शिस्त लावणे, कर्मचाऱ्यांच्या पगार वेळेवर होणे याकडे लक्ष दिले जाईल.'
ते पुढे म्हणाले, लातूरकरांनी आम्हाला विरोधात बसवले तरी सत्ताधाऱ्यांकडून योग्य काम करून घेण्याची भूमिका आमची राहणार आहे. मनपा कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य लातूरकरांना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी भाजपा अग्रेसर राहील. शहरातील कचरा, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, ट्राफिक यासारख्या मूलभूत प्रश्नांवर जातीने लक्ष देऊन ते
सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकास कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis