
महिला व बालकल्याण समितीतही भाजपाचा विजय
नांदेड, 25 मार्च (हिं.स.) : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने सर्व पदांवर विजय मिळवला.
स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे विरेंद्रसिंघ जगतसिंघ गाडीवाले यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सदिच्छा सोनी पाटील, तर उपसभापतीपदी निरंजना राजू लांडगे यांची निवड करण्यात आली.
या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थायी समिती व महिला व बालकल्याण समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.
नामनिर्देशन अर्जांच्या छाननीनंतर प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्याने संबंधित उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, कोणत्याही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis