नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची धमकी; ईमेलमुळे प्रशासनाची धावपळ
नंदुरबार, 25 मार्च (हिं.स.) । राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज सकाळी एकच खळबळ उडाली. सकाळी 12:10 वाजता मिळालेल्या ईमेलमध्ये साय
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची धमकी; ईमेलमुळे प्रशासनाची धावपळ


नंदुरबार, 25 मार्च (हिं.स.) । राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज सकाळी एकच खळबळ उडाली.

सकाळी 12:10 वाजता मिळालेल्या ईमेलमध्ये सायनॉइड विषारी वायू मिश्रित आरडीएक्स बॉम्बद्वारे स्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती. ही कार्यालये नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असल्यामुळे तातडीने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना याबाबत माहिती देण्यात आली.

घटनेच्या गांभीर्याची जाणीव करून प्रशासनाने तात्काळ इमारत रिकामी करून सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, पोलीस निरीक्षक निलेश देसले आणि बॉम्ब शोधक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले.

बॉम्ब शोधक पथकाने 'सिंबा' या श्वानाच्या मदतीने परिसराची तांत्रिक तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू सापडली नाही. तपासणीनंतर सर्व कार्यालयांचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना आवाहन केले की, “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.”

----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande