
कोलकाता, 25 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माजी टेनिस स्टार लिएंडर पेस यांनी कोलकाता भेटीवर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची मंगळवारी रात्री भेट घेतली. या भेटीनंतर पेस यांच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांना जोर आला आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की लिएंडर पेस हे बंगालमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. लिएंडर पेस यांनी 4 वर्षांपूर्वी त्यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र गोवा निवडणुकीनंतर त्यांची पक्षातील सक्रियता कमी झाल्याचे दिसून आले. भाजपकडून अशी माहिती समोर आली की नितिन नवीन आणि पक्ष नेतृत्वाची इच्छा आहे की लिएंडर पेस यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. पक्षातील सूत्रांच्या मते, पेस आणि नितिन नवीन यांच्यातील बैठक सकारात्मक झाली असून चर्चा पुढे सरकली आहे. दरम्यान दोन्ही बाजूंनी याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
नितिन नवीन सध्या 2 दिवसीय बंगाल दौऱ्यावर असून ते पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आहेत. बंगाल भाजपचे मत आहे की लिएंडर पेस यांना पक्षात सामील करण्यात यश आले, तर क्रीडा क्षेत्रात सकारात्मक संदेश जाईल आणि सुशिक्षित वर्गामध्ये पक्षाची प्रतिमा सुधारेल. दरम्यान, लिएंडर पेस यांनी 29 ऑक्टोबर 2021 रोजी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी ममता बनर्जी यांचे कौतुक करत त्यांना ‘खऱ्या अर्थाने चॅम्पियन’ असे संबोधले होते.
मात्र अलीकडच्या काळात पेस तृणमूलच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळे भाजप अध्यक्षांसोबतच्या त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे भाजपने अजूनही बंगालमधील 38 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केलेली नाही, त्यामुळे त्या यादीत पेस यांचे नाव असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी