
रत्नागिरी, २५ मार्च (हिं.स.) : कोकण रेल्वे मार्गावरून दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने सुरत ते मंगळुरू दरम्यान चालवली जाणारी विशेष गाडी आता नियमित केली आहे. रेल्वे बोर्डाने २० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ ही गाडी आता १९०५७/१९०५८ सुरत-मंगळुरू एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाईल.
वेळापत्रक
गाडी क्रमांक १९०५७ (सुरत ते मंगळुरू) – दर बुधवारी आणि रविवारी संध्याकाळी १९:३५ वाजता सुरतवरून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री १९:४५ वाजता मंगळुरूला पोहोचेल.
गाडी क्रमांक १९०५८ (मंगळुरू ते सुरत) – दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री २२:३० वाजता मंगळुरूमधून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरतला पोहोचेल.
प्रमुख थांबे
गाडी उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल येथे थांबेल.
विशेष गाडी नियमित झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा-कर्नाटक किनारपट्टीवर जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होईल. यापूर्वी ही गाडी ‘विशेष’ म्हणून चालवली जात असल्याने फेऱ्यांबाबत अनिश्चितता असायची, परंतु आता गाडी नियमित झाल्याने प्रवाशांना आगाऊ आरक्षण करणे सोपे जाईल.
------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी