
रायगड, 25 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या “लाडकी बहीण” योजनेत जिल्ह्यातील हजारो महिलांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाभ मिळण्यास अडथळा निर्माण होत असून प्रशासनाने तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ६३ हजार ७८२ महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया चुकीची किंवा अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. सध्या तब्बल २२ हजार ३७५ महिलांनी ई-केवायसी पुन्हा पूर्ण केलेले नाही.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी सांगितले की, संबंधित लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ३१ मार्च २०२६ पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणांमध्ये पनवेल तालुका आघाडीवर असून येथे ५ हजार १४० प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापाठोपाठ अलिबाग (२,६३३), कर्जत (१,९६२), खालापूर (१,७७२), माणगाव (१,७९९), महाड (१,६५६), पेण (१,५३३), उरण (१,३७६) अशी आकडेवारी आहे. इतर तालुक्यांमध्येही शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सन २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण आणि स्वावलंबन वाढविणे हा आहे. कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणे हेही या योजनेचे प्रमुख ध्येय आहे.
दरम्यान, ई-केवायसी करताना काही अडचणी येत असल्यास संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ बंद होऊ शकतो, याची नोंद लाभार्थींनी घ्यावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)