
रायगड, 25 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र राज्यातील शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांना सन्मानित करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांसाठी आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कृषी विभागाने यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली असून अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यात आली आहे.
राज्यात दरवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित, सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण, युवा शेतकरी पुरस्कार तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी शेतकरी व संबंधितांना गौरविण्यात येते. हे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान केले जातात.
यापूर्वी या पुरस्कारांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने चार प्रतींमध्ये सादर करावे लागत होते. या प्रक्रियेमुळे वेळ, खर्च आणि कागदपत्रांची पुनरावृत्ती होत होती. आता ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार असून, कागदपत्रे एकदाच अपलोड केल्यानंतर पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही. (https://krishi.maharashtra.gov.in) या वेब वर अर्जाची स्थितीही सहज तपासता येणार आहे.
नवीन प्रणालीमुळे छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्टाचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका होणार आहे. यासोबतच प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व मूल्यांकन प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गटांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारासाठी १५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन तात्काळ अर्ज करावेत, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)