पनवेल मनपाच्या ‘टी.बी. मुक्त भारत’ मोहिमेला भव्य प्रारंभ
रायगड, 25 मार्च (हिं.स.) : क्षयरोग निर्मूलनासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टी.बी. मुक्त भारत अभियान’ अंतर्गत १०० दिवसीय विशेष मोहिमेचा शुभारंभ जगतिक क्षयरोग दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे उत्
पनवेल मनपाची १०० दिवसीय ‘टी.बी. मुक्त भारत’ मोहिमेला भव्य प्रारंभ


रायगड, 25 मार्च (हिं.स.) : क्षयरोग निर्मूलनासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ‘टी.बी. मुक्त भारत अभियान’ अंतर्गत १०० दिवसीय विशेष मोहिमेचा शुभारंभ जगतिक क्षयरोग दिनानिमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे व उपायुक्त प्रसेनजीत कार्लेकर यांनी तुळशीच्या रोपाने मान्यवरांचे स्वागत केले. नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जनजागृतीपर नाट्यप्रयोगातून क्षयरोगाबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.

यानंतर दीपप्रज्वलन करून वैज्ञानिक रॉबर्ट कॉच यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत प्रतिबंध, लवकर निदान, प्रभावी उपचार व जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. तसेच मनपाकडे पाच अत्याधुनिक एक्स-रे मशिन्स उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात ‘नि-क्षय मित्र’ संकल्पनेची माहिती देण्यात आली. क्षयरोग निर्मूलनासाठी योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तसेच रुग्णांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. “होय, आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो” या थीमनुसार सामूहिक प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande