
येवला, 25 मार्च (हिं.स.)।
कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येवला शहरात सोमवारी दुपारी भव्य ‘शेतकरी जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे येवला शहर घोषणाबाजीने दणाणून गेले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. हातात मागण्यांचे फलक घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेला हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. तेथे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलेले मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बच्चू कडू यांनी प्रशासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.कांदा भावांतर आणि अनुदान संदर्भातील मागण्यांबाबत पणन मंत्र्यांकडून लवकरच मुख्यमंत्री कार्यालयात बैठक घेऊन निर्णय करण्याचे आश्वासन देण्यात आले. तर पाटपाणी व वीजपुरवठा समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली.संध्याकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास आक्रोश मोर्चा प्रशासकीय संकुलात पोहोचला. साडेनऊच्या सुमारास वरिष्ठ स्तरावरून खात्रीशीर आश्वासन मिळाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.मोर्चाला संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, “शेतकरी आज अडचणीत आहे, पण सरकारला त्याचे गांभीर्य नाही. आमच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि येवला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या...
हमीभाव : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त हमीभाव जाहीर करावा.
अनुदान : बाजारभाव कोसळल्यास शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १००० रुपये अनुदान द्यावे.
कर्जमुक्ती : निवडणूकपूर्व आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करावा.
वीजपुरवठा : शेती पंपांसाठी दिवसा सलग १२ तास अखंडित वीजपुरवठा द्यावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV