
नवी दिल्ली , 25 मार्च (हिं.स.)।रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.या प्रसंगी आठवले यांनी तिसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य म्हणून संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, ही संधी पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यावर दाखवलेल्या विश्वासाचे आणि मार्गदर्शनाचे प्रतीक असून, ते ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडत राहतील.
रामदास आठवले म्हणाले की, ते भारतीय जनता पक्षासोबत देशात सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि वंचित घटकांच्या सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्य करत राहतील.या भेटीदरम्यान त्यांनी अनुसूचित जाती (एससी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाढविण्याचा मुद्दाही पंतप्रधानांसमोर मांडला, ज्यामुळे या घटकांतील युवकांना शिक्षण व रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील.
संविधान निर्माता डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत आठवले म्हणाले की, शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय हे सशक्त राष्ट्राचे मूलभूत आधार आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या मूल्यांना अधिक बळ मिळत असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.तसेच जनगणनेदरम्यान बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींसाठी योग्य वर्गीकरण सुनिश्चित करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला, जेणेकरून त्यांना आरक्षणाच्या लाभांपासून वंचित राहावे लागू नये.
आठवले यांनी सांगितले की, आगामी काळात ते देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या विचारधारेचा, सामाजिक समरसतेचा आणि संविधानिक मूल्यांचा व्यापक प्रचार-प्रसार करतील तसेच केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode