
पुणे, 25 मार्च, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील खर्चिक आणि मोठे प्रकल्प बंद करावेत, लहान कामांसाठी निधी द्यावा, नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही, त्यामुळे नवीन बांधकाम प्रकल्पांना मान्यता देऊ नये, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा या मूलभूत समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. महापौर रवि लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भाजपच्या विनोद नढे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करत सव्वा तास भाषण केले. ‘प्रशासनाने अर्थसंकल्पाची वाताहत केली होती. स्थायी समितीने चांगली सुधारणा केली आहे. लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रशासकीय राजवटीत वाढीव दराच्या निविदा, थेट खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेची लूट करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी. मोठ्या नस्ती खुल्या कराव्यात,’ अशी मागणी त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु