
लातूर, 25 मार्च (हिं.स.) :लातूर जिल्ह्यात शेतांमध्ये गांजाची लागवड आढळल्याच्या आधीच्या घटनांनंतर, अहमदपूर तालुक्यातील विळेगाव शेतशिवारात प्रतिबंधित अफूची झाडे सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, 24 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9.50 वाजण्याच्या सुमारास किनगाव पोलीस व महसूल प्रशासनाने विळेगाव शिवारात कारवाई केली. या कारवाईदरम्यान, आरोपी अशोक निवृती चिंचोलकर यांच्या शेतात अफूची लागवड केल्याचे आढळले. आरोपीच्या शेत गट क्रमांक 231 मध्ये एकूण 19 अफूची झाडे आणि 26 बोंडे जप्त करण्यात आले. या बोंडांचे वजन सुमारे 140 ग्रॅम असून, प्रति ग्रॅम 100 रुपये प्रमाणे अंदाजे 14 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 67/2026 नोंदवला असून, आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 (क), 18 नुसार कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी वसंतराव वल्लमपल्ले यांनी तक्रार दिली आहे. सदर गुन्हा 25 मार्च 2026 रोजी पहाटे 3.02 वाजता नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके करत आहेत.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis