पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड; 13 आरोपींवर कारवाई
परभणी, 25 मार्च,(हिं.स.)। पाथरी शहरातील जुगार अड्डे व मटका बुकी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धाड टाकत दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत एकूण 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आल
पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड; 13 आरोपींवर कारवाई


परभणी, 25 मार्च,(हिं.स.)। पाथरी शहरातील जुगार अड्डे व मटका बुकी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धाड टाकत दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत एकूण 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 1 लाख 49 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईत रशिद कॉलनी परिसरातील एका शेडमध्ये ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळताना 8 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 33 हजार 200 रुपयांची रोकड व 7 मोबाईल असा एकूण 83 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 148/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अनिल हत्ती अंबीरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दुसर्या कारवाईत नायब हॉटेल परिसरातील एका शेडमध्ये ‘फन टारगेट चक्री (बिंगो)’ हा ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी 5 आरोपींना ताब्यात घेऊन 36 हजार 600 रुपयांची रोकड, एक मोबाईल तसेच संगणक व अन्य साहित्य असा एकूण 66 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 149/2026 दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ नारायण शितळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 69 हजार 800 रुपयांची रोकड, 8 मोबाईल तसेच संगणक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले असून नागरिकांनी अवैध व्यवसायांविषयी माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन (9150100100) चा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande