
पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा निर्णय
अमरावती, २५ मार्च (हिं.स.) :शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक व निसर्गरम्य शिवटेकडी (मालटेकडी)च्या सर्वांगीण विकासासाठी अमरावती महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिवटेकडी व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सौंदर्यीकरण, सुविधा वाढविणे आणि पर्यटनाला चालना देण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत परिसरात लँडस्केपिंग, हरित क्षेत्राचा विस्तार, पादचारी मार्गांचे सुधारीकरण, बसण्यासाठी बाकांची व्यवस्था, प्रभावी प्रकाशयोजना आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे ठरविण्यात आले. तसेच, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, माहिती केंद्र, पार्किंग सुविधा आणि मार्गदर्शक फलक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिवटेकडीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यामुळे तसेच सुरू असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पामुळे या परिसराचे सांस्कृतिक महत्त्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व विकासकामांमुळे शिवटेकडी हे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी